कोल्हापूर - महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पीठ, अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराची ख्याती सर्वदूर आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. याच अंबाबाईच्या मंदिराचे पौराणिक महत्त्व आणि मंदिराविषयी सविस्तर माहितीचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा खास आढावा...
संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी समजल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईचे हे मंदिर सुमारे 1200 वर्षांपूर्वीचे अतिप्राचिन मंदिर आहे. चालुक्यांच्या काळात इ.स. 700 च्या आसपास हे बांधले असल्याचे बोलले जाते. मात्र, अद्यापही मंदिर कोणी बांधले याची निश्चिती झाली नाही. मंदिराची रचना आणि मांडणीवरून मंदिर त्याच काळातील असल्याचा अनेक अभ्यासकांचा दावा आहे. मात्र, मंदिराच्या याच रचना आणि बांधणीमुळे मंदिराला आणखी विशेष बनवते.
पाच शिखराच्या या मंदिराचे पश्चिम दिशेला तोंड असून त्याचे एकूण चार भाग आहेत. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या आदिशक्ती याठिकाणी विराजमान आहेत. मंदिरावर वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, योद्धे, नर्तकी, अप्सरा आदी कोरलेले पाहायला मिळतात. देवीच्या दगडी मुर्तीमागे सिंह असून डोक्यावर मुकुट आणि त्यावर नागमुद्रा कोरलेली आहे. देवीच्या मुर्तीच्या डोक्यावर म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग आहे. त्याठिकाणी शक्यतो भाविकांना प्रवेश नाही. दररोज आरतीच्यावेळी आणि वर्षांतून केवळ 4 वेळा हे मंदिर उघडले जाते. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पश्चिम दिशेला असलेल्या महाद्वाराबरोबरच घाटी दरवाजा, पूर्व आणि पश्चिम असे एकूण चार भव्य दगडी प्रवेशद्वार आहेत. मंदिर परिसरात अनेक लहान-लहान मंदिरांबरोबरच शिलालेख सुद्धा आजही पाहायला मिळतात.
सुरक्षित ठेवलेल्या अंबाबाई मूर्तीची 1715 मध्ये पुन्हा प्रतिष्ठापना
अंबाबाईच्या या मंदिरावर प्राचीन आणि अर्वाचिन काळात काही आक्रमणे झाल्याचे म्हटले जाते. मोघलाईच्या काळात अनेक मंदिरे उध्वस्त करण्यात आली. अंबाबाईच्या मंदिराबाबतही अशी भीती निर्माण झाली होती. अशा प्रकारच्या परकीय आक्रमाकांपासून संरक्षण करण्यासाठी अंबाबाईची मूर्ती मंदिर परिसरात राहणाऱ्या एका पुजाऱ्याच्या घरात सुरक्षित ठेवण्यात आली होती. जवळपास 305 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 सप्टेंबर, 1715 मध्ये नरहरभट सावगावकर यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे करवीर संस्थानचे छत्रपती संभाजी दुसरे यांच्या आज्ञेने सिदोजी घोरपडे यांनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली. या घटनेला तब्बल 305 वर्षे पूर्ण झाली आहेत.
मंदिरातील प्रमुख उत्सव
शारदीय नवरात्रौत्सव, चैत्र महिन्यात होणारा रथोत्सव आणि किरणोत्सव असे काही उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात दरवर्षी पार पडत असतात.