माहिती देताना रियाज बागवान कोल्हापूर : राज्यभरात आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईदचा दुग्ध शर्करा योग आज जुळून आला आहे. दरम्यान, कोल्हापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आज एकत्र आषाढी एकादशी आणि ईद साजरी केली. आज आषाढी एकादशी असल्याने कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने दिली जाणारी कुर्बानी पुढे ढकलत, सामाजिक सलोखा जपला आहे.
राज्यभरात एकादशीचा उत्साह: जे काही जगावेगळे ते कोल्हापुरात पाहायला मिळते, असे म्हणतात त्याचा प्रत्यय नेहमी येतच असतो. एकीकडे आज देशभरात बकरी ईद साजरी होत आहे, तर दुसरीकडे आषाढी एकादशीचा उत्साह हा राज्यभर आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी आज सकाळी नमाज पठण करत बकरी ईदच्या निमित्ताने दिली जाणारी कुर्बानी पुढे ढकली आहे. हिंदू -मुस्लिम ऐक्याचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या शिकवणीतून प्रत्येक सणाला हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये फराळ, खीर याची देवाण-घेवाण होते. सणांमधूनच सामाजिक एकोप्याला चालला मिळते.
सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न : यंदा झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी काही माथेफिरूनी आक्षेपार्ह स्टेटस लावून पुरोगामी कोल्हापूरच्या सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत अशा कोणत्याही प्रकाराला यापुढे थारा मिळणार नाही. हिंदू मुस्लिम एकाच आईची लेकरे आहेत. अशा पद्धतीने आमचे आचरण असते, धर्म, पंथ जातीला कोणत्याही प्रकारचा आश्रय कोल्हापुरात मिळणार नाही. म्हणूनच हे जगावेगळे कोल्हापूर आहे अशी प्रतिक्रिया, रियाज बागवान यांनी व्यक्त केली.
अनेकांच्या भुवया उंचावल्या: राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात अठरापगड जाती आणि सर्वधर्मीयांना समानता मिळाली. तोच धागा आजही कायम आहे. दोन्ही धर्मीयांना एकत्र ठेवण्याची अनेक निमित्त कोल्हापूरच्या सामाजिक परिघात आहेत. शिवराज्याभिषेक दिनी काही समाजकंटकांनी सोशल मीडियावरून हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र कोल्हापुरात असा प्रकार घडतोच कसा याबाबत नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. या घटनेला महिनाही उलटला नाही, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज साजरी होत असलेली ईद आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापुरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकोपा टिकावा, यासाठी केलेले हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद ठरणार आहेत.
हेही वाचा-
- Eid Al Adha 2023 : जगभरात ईद उल अजहाचा उत्साह, नेत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
- Ashadhi Ekadashi 2023: बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे- मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे
- Ashadhi Wari 2023 चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविकांची गर्दी भाविकांच्या गर्दीने फुलली विठ्ठू नगरी