महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Herwad Village : कोल्हापुरातील हेरवाड ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा बंद; कुंकू पुसण्याची, मंगळसूत्र काढण्याचीही गरज नाही - विधवा प्रथा बंदचा हेरवाड ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर

विधवांना सन्मानाने (stop widow tradition) समाजात जगता यावे यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव हेरवाड (ता. शिरोळ) येथील गावसभेत (Herwad Gram Panchayat) केला. पती निधनानंतर महिलेचे मंगळसूत्र तोडण्यात येते, कुंकू पुसण्यात येते, बांगड्या फोडल्या जातात, जोडवी काढण्यात येतात, त्याचबरोबर आयुष्यभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेता येत नाही, अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला आहे.

Herwad village
हेरवाड ग्रामपंचायत

By

Published : May 9, 2022, 8:46 AM IST

Updated : May 9, 2022, 12:15 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू असून विधवा महिलांना सन्मान मिळवून देणारा विधवा प्रथा बंद (Stop Widow Tradition) करण्याचा निर्णय या गावाने घेतला आहे. हेरवाड असे या गावचे नाव (Herwad Gram Panchayat) असून, इथल्या ग्रामपंचायतीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजही 21 व्या शतकात अनेक ठिकाणी विधवा महिलांना वेगळी वागणूक मिळत असते. त्या सर्वांनी या ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय आता पाहण्याची गरज आहे.

कोल्हापुरातील हेरवाड ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा बंद

ग्रामपंचायतीचा महत्वपूर्ण निर्णय; महिला होत्या सूचक आणि अनुमोदक -दरम्यान, शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याबाबतचा महत्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर केला. त्याची आता सर्वत्र चर्चा सुरू असून ग्रामपंचायतीचे कौतुक सुरु आहे. खरंतर कायद्यानुसार सर्वच महिलांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे हा अधिकार आहे. मात्र, विधवा महिलांबाबतचे समाजातील चित्र थोडे वेगळे होते. त्यामुळेच गावचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि ग्रामपंचायतमधील उपसरपंच तसेच सर्वच सदस्यांनी मिळून ग्रामसभेत विधवा प्रथाच बंद करण्याबाबतचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या ठरावाच्या महिलाच सूचक आणि अनुमोदक होत्या हे विशेष आहे. मुक्ताबाई संजय पुजारी या सूचक होत्या, तर सुजाता केशव गुरव या अनुमोदक होत्या. 5 मे रोजी हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

हेरवाड गावची ग्रामसभा

हेही वाचा -Pune Widow Kumkum Program : जुनाट प्रथेला फाटा देत विधवेने केला हळदी कुंकवाचा कार्यक्रम; कुटुंबानेही दिली साथ

काय आहे ठरावात? यावर एक नजर -ठरावात म्हंटले आहे की, आपल्या समाजात पतीच्या निधनानंतर अंत्यविधिवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे पायातील जोडवी काढले तसेच महिलाला विधवा म्हणून कोणत्या प्रकारचा धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार दिला आहे. या प्रथेमुळे महिलांच्या अधिकाऱ्यांवर गदा येते म्हणजेच कायद्याचा भंग होतो. म्हणूनच विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही विधवा प्रथा बंद करण्यात येत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. शिवाय याबाबात आता गावात जनजागृती सुद्धा करण्यात यावी याबाबतसुद्धा सूचना देण्यात आल्या.

विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव

हेही वाचा -जिवंतपणी भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय व महाराष्ट्रीयन महर्षी धोंडे केशव कर्वे.. महिलांसाठी जीवन समर्पित केलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व

विधानसभेत कायदा मंजूर करावा -दरम्यान, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही विधवा प्रथा बंद व्हावी याबाबत जनजागृती करत असून गावातील अनेकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच गावातील नेत्यांचे सुद्धा याला मार्गदर्शन लाभले असून याबाबतचा ठराव आपण ग्रामसभेत मंजूर केला आहे अशी प्रतिक्रिया सरपंच सुरगोंडा पाटील यांनी व्यक्त केली. शिवाय या पद्धतीनेच राज्यासह देशभरातील अनेक ग्रामपंचायतींनी सुद्धा याचे अनुकरण करावे अशी ईच्छा सरपंचांनी व्यक्त केली आहे. एव्हढेच नाही तर सर्वच सामाजिक संस्थांनी सुद्धा विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आपल्यापरीने जनजागृती करावी आणि विधानसभेत सुद्धा याबाबतचा कायदा व्हावा अशी मागणी सुद्धा सरपंच पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : May 9, 2022, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details