कोल्हापूर- 2019 च्या महाप्रलयाच्या आठवणी ताज्या असतानाच या वर्षी कोल्हापुरात पुन्हा महापुराचे सावट आहे. सलग 3 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
रात्री उशिरा पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुटांवर गेली असून 43 फुटांवर धोका पातळी आहे. तर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अशाच पद्धतीने पावसाचा जोर कायम राहिल्यास काही तासातच धोका पातळी सुद्धा ओलांडण्याची शक्यता आहे.
तिकडे धरणक्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे सुद्धा उघडतात, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच, सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या आंबेवाडी आणि चिखली गावाला भेट देत नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा-जिल्ह्यात कोरोना-पावसाचे दुहेरी संकट, कोल्हापूरकर मात्र पर्यटनात गुंग