कोल्हापूर - जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. २४ तासांत तब्बल १२ फुटांनी पाणी पातळी वाढली असून राजाराम बंधाऱ्यासह एकूण ४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय जिल्ह्यातील काही मार्गावर पाणी आले असून काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
बुधवारी पाणीपातळी १३ फुटांवर होती आता २४.६ फुटांवर-
बुधवारी पहाटेपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकसारखा पाऊस सुरू आहे. काल सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथील पाणी पातळी १३ फूट इतकी होती. त्यामध्ये जवळपास १२ फुटांनी वाढ झाली असून आज सकाळी ८ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २४.६ इतकी झाली आहे. तर जिल्ह्यातील तब्बल ४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर काही मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद असून जिल्ह्यातील कोल्हापूर गारगोटी रोड वरील चंद्रे फाटा-शेळेवाडी मध्यभागी पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी केलेला रस्ता पाण्याने वाहुन गेला आहे. त्यामुळे त्यांनी पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी पातळीत झपाट्याने वाढ -