कोल्हापूर : जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर ग्रामीण भागात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला असून, परिणामी पंचगंगा पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर धरण क्षेत्रातही पाऊस जोरात सुरू असल्याने तळ गाठलेले राधानगरी धरण देखील 36.91 टक्के भरले आहे. तर दुपार पासून राधानगरी धणाच्या विद्युत विमोचनातून 700 क्युसेक्स पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सात बंधारे पाण्याखाली :जिल्ह्यातील धरण क्षेत्र असलेल्या राधानगरी, गगनबावडा, शाहुवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असला तरी, पावसाची बॅटिंग मात्र काय थांबलेली नाही. परिणामी कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फूट 7 इंचावर पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राजाराम बंधारा, शिंगणापूर बंधारा, रुई बंधारा, सुर्वे बंधारा, इचलकरंजी बंधारा, तेरवाड बंधारा, शिरोळ बंधारा यांचा समावेश आहे. दरम्यान हे सर्व बंधारे पाण्याखाली गेल्याने यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग सुरु : सर्वाधिक पावसाची नोंद ही गगनबावडा तालुक्यात 417.5 मिमी करण्यात आली आहे. राधानगरी तालुक्यात 152.7 मिमी आणि आजरा तालुक्यात 163.8 मिमी तर शाहूवाडी तालुक्यात 149.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे धरण क्षेत्रात देखील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूर शहराची तहान भागवणारे राधानगरी धरण 36.61 टक्के भरले आहे. यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज दुपारपासून 800 क्युसेक्स पाणी राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचन मधून भोगावती नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.