महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर; रांगणा किल्ल्यावर पर्यटक अडकले तर राऊतवाडी धबधब्याने दाखवले रौद्ररूप - Panchganga River

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. परिणामी ओढे, नदी दुथडी भरून वाहत आहे. तर जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या राऊतवाडी धबधब्याने देखील रौद्र रूप धारण केले आहे.

Kolhapur Rain Update
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

By

Published : Jul 19, 2023, 9:32 PM IST

Updated : Jul 19, 2023, 10:55 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, राऊतवाडी धबधब्याने दाखवले रौद्ररूप

कोल्हापूर : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. राधानगरी धरणातून एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू असल्याने, पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे दुपारी 2 वाजता 24 फूट 4 इंच इतकी नोंदली गेली आहे. तर हवामान खात्याने जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रात्री उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर पाणी आले आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर पाणी आले आहे. पंचगंगेची पाणी पातळी 28 फूट 9 इंचावर गेली. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे चालली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 42 फूट आहे. तसेच जिल्ह्यातील 49 बंधारे पाण्याखाली तर जिल्ह्यातील 3 जिल्हामार्ग तर 2 राज्यमार्ग बंद केले आहेत. उद्या ही पाऊसाचा जोर कायम राहणार आहे.

दुपारपर्यंत 25 बंधारे पाण्याखाली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रासह गगनबावडा, राधानगरी, आजरा, शाहूवाडी या परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, पंचगंगा नदीची पाणी पातळी ही दुपारी 22 फूट 6 इंचावर पोहोचली होती. तर जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या राधानगरी धरणात 58.30 टक्के पाणीसाठा झाला होता. धरणाच्या विद्युत विमोचनातून 700 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.




कोल्हापुरात पंचगंगा पाणी पातळीत वाढ: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुरू आहे. तर राजाराम बंधाऱ्यासह दुपारीच जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेले. खबरदारी म्हणून बंधाऱ्यांवरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर कोल्हापूरची तहान भागवणारे राधानगरी धरण 58.30 टक्के भरले आहे. तर राधानगरी धरणातून प्रतीसेकंद 1000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. पाऊस असाच कायम राहिल्यास पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटन स्थळी जाण्यास बंदी देखील घालण्यात आली आहे.


राऊतवाडी धबधब्याने घेतले रौद्ररूप :वर्षा पर्यटनासाठी भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर गेलेले 17 पर्यटक पूल वाहून गेल्याने सहा तास किल्ले रांगणावर अडकून पडले होते. तब्बल सहा तासानंतर या पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थांनी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी आज पहाटेच्या सुमारास दोरीच्या साह्याने बाहेर काढले. तर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या राऊतवाडी धबधब्याने देखील रौद्र रूप धारण केले आहे. या धबधब्यातून चिखलमय गढूळ पाणी जोरदारपणे ओसंडून वाहताना दिसत आहे.




17 पर्यटक अडकले : किल्ले रांगणा फिरून येताना परतीच्या मार्गावर असणाऱ्या ताब्यांचीवाडी ओढ्याला पूर आल्याने 17 पर्यटक अडकले. मुसळधार पाऊस, ओढ्याला आलेला पूर, आजूबाजूला घनदाट झाडी, त्यातून येणारे प्राण्यांचे आवाज अशा परिस्थितीत हे पर्यटक येथे अडकले होते. मदतीसाठी त्यांनी आरडाओरड सुरू केली. याची माहिती स्थानिक नागरिकांना तसेच जिल्हा आपत्ती कक्षाला मिळाली. स्थानिक ग्रामस्थांनी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानाने दोरीच्या साह्याने सर्व पर्यटकांना पहाटेच्या पाचच्या सुमारास सुखरूपपणे बाहेर काढले आहे.




जिल्हा प्रशासनाकडून दूरध्वनी क्रमांक जारी : हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यातपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने, जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागासह सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तर खबरदारी म्हणून एनडीआरएफची एक तुकडी कोल्हापुरात दाखल झाली आहे. सोबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्वयंसेवक देखील प्रत्येक तालुक्यात, गावात सज्ज आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांकसह दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. नागरिकांना काही आपत्ती आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक १०७७ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग: ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४



हेही वाचा -

  1. Heavy Rainfall in Kolhapur: धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
  2. Flood : संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; एनडीआरएफची तुकडी दाखल
  3. Kolhapur Mud Festival 2023: कोल्हापुरात चिखल महोत्सव; 250 विद्यार्थ्यांनी लुटला चिखलात खेळण्याचा आनंद
Last Updated : Jul 19, 2023, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details