कोल्हापूर- राज्यात पावसाने थोड्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे. कोल्हापूरसह धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८.७ फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे पंचगंगा कोणत्याही क्षणी राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ओलांडू शकते.
राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ३९ फूट आहे, तर धोका पातळी ४३ फूट आहे. सध्या बंधाऱ्याच्या पाच दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग चालू आहे. मध्यरात्री राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले गेले होते. पावसामुळे जिल्ह्यातील ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, पंचगंगेचे पाणी पुन्हा शहरात जाण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत गायकवाड वाड्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची तीन पथके जिल्ह्यातील विविध ठिकाणी दाखल झाली आहेत.