कोल्हापूर- महापुराने थैमान घातल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा पावसाने हाहाकार घातला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिरोळमधील ४ गावातून ९७ तर करवीरमधील चिखलीतून २५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
महापुराने थैमान घातल्यानंतर जिल्ह्यातील पूरग्रस्त पुन्हा भयभीत झाले आहेत. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून चिखली आंबेवाडी ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहेत. त्यामुळे जनावर आणि संसारोपयोगी साहित्य घेऊन येथील नागरिक स्थलांतर करत आहेत. ग्रामस्थांवर ओढावलेला यावर्षीचा हा दुसरा प्रसंग आहे. मागील महिन्यात आलेल्या महाप्रलयावेळी चिखली आणि आंबेवाडीसह शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसला होता.