कोल्हापूर- अतिग्रे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवकाने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रमेश धोंडीराम कोरवी असे आत्महत्या करणाऱ्या आरोग्य सेवकाचे नाव आहे. कोरवी यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये त्यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे कारण नमूद केले आहे.
या प्रकरणी आरोग्य सहाय्यक सुरेश वर्णे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. मात्र घटनास्थळी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने भेट न दिल्याने नातेवाईंकांनी आक्रमक पवित्रा घेतला. वरिष्ठ आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. त्यामुळे आरोग्य केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे जिल्हापरीषदेच्या हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एक उपकेंद्र आहे. कोल्हापूर येथील रमेश धोडींराम कोरवी(हरिओम नगर) हे आरोग्य विभागात गेल्या 18 वर्षापासुन आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. तर गेल्या चार वर्षापासून ते हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत होते. त्यांच्याकडे अतिग्रे उपकेंद्राच काम देण्यात आले होते. सध्या कोरोना या आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. कोरवी हे शनिवारी दिवसभर गावातील लसीकरण केंद्रावर सेवा बजावत होते. त्यानंतर सायंकाळी ते कोल्हापूरला गेले, पंरतु, त्याच दिवशी रात्र पाळी असल्याचे सांगत ते रात्री १० वाजता पुन्हा घराबाहेर पडले आणि अतिग्रे येथील आरोग्य उपकेंद्रात येऊन कोरवी यांनी गळफास घेतला.