कोल्हापुर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध आपण यापूर्वीही पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. काल रविवारी मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून चोख प्रत्युत्तर दिले होते. आता मुश्रीफ यांनी पुन्हा त्यांना लक्ष केले असून, ''इधर उधर की बात ना कर, ये बता काफ़िला क्यू लुटा'' असे म्हंटले आहे. शिवाय मी चंद्रकांत पाटलांना काहीही बोललो नव्हतो, मात्र त्यांना चोमडेपणा करायची काय गरज असेही मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.
पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस कदाचित राज्यसभेवर जातील
काल पुण्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवावी असे मुश्रीफ यांना म्हटलं होतं. तोच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांच्या लोकप्रियतेबाबत मला काही बोलायचं नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि महाविकासआघाडी वर टीका झाली तर मला बोलायला कोणीही रोखू शकत नाही. आपल्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान झाल्यावर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करायची नाही का ? असा सवाल करत, पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी कदाचित फडणवीस राज्यसभेवर जातील आणि चंद्रकांत पाटील त्यांच्या जागी विधानसभा नागपूर मधून लढवतील, असा खोचक टोलाही मुश्रीफ यांनी यावेळी भाजापाला लगावला आहे.