कोल्हापूर - मी आजपर्यंत कोणतीच निवडणूक हरलेलो नाही. कोल्हापूरमधून आजही निवडणूक लढवण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही तर, राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे थेट आव्हान चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना दिले होते. त्यांच्या या आव्हानाची खिल्ली उडवताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी, भाजपाचा एकही आमदार नसताना, तुमच्यासाठी जागा सोडणार कोण? असा सवाल केला आहे. एकूणच, मुश्रीफ यांनी असा सवाल करून भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह लावले आहे.
मुश्रीफ यांनी काय म्हटले -
विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण झालेले आहे, पुढील विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. त्यातच कोल्हापूरमध्ये भाजपाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे राजीनामा कोण देणार? कशासाठी?, असे सवाल करत हसन मुश्रीफ म्हणाले, कोणी राजीनामा देणार नाही, हे दादांना माहीत आहे. तसेच कोथरुडमधून आपण मेघा कुलकर्णींना डावलून निवडून आला आहात. अशावेळी भाजपाही तुम्हाला परवानगी कशी देईल? दोन्हीही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे दादांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुमची येथेच गरज आहे, अशी कोपरखळी मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना दिली.
नेमके काय आहे प्रकरण -
बेळगाव सीमाप्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चंद्रकात पाटलांना लक्ष्य केले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणतात, चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार, मात्र यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांची कोणतीही भूमिका नाही. यावर ते काहीही भाष्य करत नाहीत, अशी टीका उदय सामंत यांनी केली होती. तसेच, चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमध्ये कोणताच जनाधार नाही. आपण पराभूत होऊ, याची कल्पना असल्यानेच ते पुण्यातून निवडणुकीला उभे राहिले, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर पुण्यामध्ये देत चंद्रकांत पाटलांनी निवडणूकीचे आव्हान दिले होते.