कोल्हापूर - परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप साफ खोटे आहेत. मुळात स्वतःला वाचविण्यासाठी त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रकार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शिवाय सत्ता गेल्यापासून भाजप अस्वस्थ असून त्यांची 'सोची समझी चाल' असल्याचेही मुश्रीफांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केलेले हे कटकारस्थान आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लावणे ही भाजपची 'सोची समझी चाल' - मुश्रीफ मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या कथित पत्रामुळे हे वातावरण आणखीनच तापले आहे. या कथित पत्रामधून परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याला दर महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट त्यांनी दिल्याचा आरोपही या पत्रात केला आहे. त्यानंतर मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत यामागे काहीतरी कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुश्रीफ यांनी कागल येथील त्यांच्या निवासस्थानी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, असे ते म्हणाले. मात्र, चौकशी न होता कारवाई करणे चुकीचे असेल, असेही ते म्हणाले.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामागे कारस्थान
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामागे खूप मोठे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त करत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काही गोष्टी नमूद केल्या आहेत. ते म्हणाले, दोन दिवस राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाऊन बसले होते. तेव्हा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांना या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यानंतर लगेचच हे पत्र प्रसिद्ध झाले. त्यामुळे माझा संशय बळावला असून त्यांना माफीचा साक्षीदार करायचे ठरवले असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
अन्वय नाईक, अर्णब गोस्वामी आणि टीआरपी घोटाळ्यापासून भाजप परमबीर सिंह यांच्यावर नाराज होते. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचले. तसेच सचिन वाझे प्रकरणातून वाचण्यासाठी हे कारस्थान असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. गेल्या सव्वा वर्षात सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून भाजप महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आजही आघाडी भक्कम आहे. सचिन वाझे प्रकरणात फडणवीस विधानसभेत सीडीआरचे दाखले देत होते. जणू यांना सर्व इव्हेंट माहिती होता का, असा सवालही मुश्रीफ यांनी केला.
काय आहे नेमकं प्रकरण
अँटिलियासमोर आढळलेली स्फोटके, मनसुख हिरेन या व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेल्या अटकेवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर बदल्या करून सरकारने विरोधकांच्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वाझे यांचा वसुलीसाठी वापर करत होते. त्यांना प्रत्येक महिन्याला शंभर कोटींचे टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप सिंग यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केला आहे. त्यानंतर आता हे प्रकरण आणखीनच तापले असून विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.