कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून 100 कोटींचा निधी मंजूर झाला असून, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवाळीपूर्वी शहरातील रस्ते चकाचक होतील, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, यावरून पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, उपायुक्त रविकांत अडसूळ यांची खरडपट्टी काढली. शहरातील रस्ते, कचरा, पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, यावर तातडीनं उपाययोजना करा, अन्यथा गाठ माझ्याशी असल्याचा गर्भित इशारा पालकमंत्री मुश्रीफ यांनी पालिका प्रशासनाला दिलाय.
प्रशासनाची काढली खरडपट्टी : आज कोल्हापूर महापालिकेचा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मुश्रीफ कोल्हापुरात आले होते. महापालिकेच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना मुश्रीफ यांनी महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, उपायुक्त रविकांत अडसूळ यांची चांगलील हजेरी घेतली. शासनाकडून निधी मंजूर असताना शहरातील रस्त्यांची कामं का होत नाहीत? असा पश्न त्यांनी प्रशासनाला केलाय. शहरातील प्रश्न प्रलंबित राहिल्यानं पालकमंत्री म्हणून माझी प्रतिमा मलिन होत आहे, अशी नाराजी मुश्रीफ यांनी व्यक्त केली. आज पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं महापालिका वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.
हद्दवाढीचा प्रश्न जैसे थे :मंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून दोन महिने झाले आहेत. या काळात पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहर आणि सीमांकनाला विरोध करणाऱ्या गावांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागलमध्ये ते अडकून पडले आहेत. जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना आजरा, बिद्री कारखान्याची निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुश्रीफ यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर शहरातील प्रश्नांकडं दुर्लक्ष :कोल्हापूर शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा, शहरातील रस्ते अशा गंभीर समस्या शहरवासीयांना भेडसावत आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बिद्री, आजरा कारखाना निवडणुकीत सक्रिय आहेत. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असतानाही मुश्रीफ या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ कोल्हापूर शहरातील प्रश्नांकडं दुर्लक्ष करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत होत्या.
हेही वाचा -
- "ज्यांनी अदानींची सुपारी घेतली, त्यांना पापडासारखं ठेचून टाकू", उद्धव ठाकरेंचा धारावी बचाव आंदोलनात इशारा
- तीन राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकीचं आव्हान - देवेंद्र फडणवीस
- मराठा आरक्षणाला शरद पवार, सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध- देवेंद्र फडणवीस