कोल्हापूर -'माझं लग्न झाल्यावर मी इथं नसेल पण माझ्या भावांचं काय? सगळीकडं सोयीसुविधा आहेत पण आमची वाडी दुष्काळग्रस्तच' एका मुलीची ही बोलकी प्रतिक्रिया आहे पाणीदार जिल्हा समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुर्वेवाडीतील. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची भीषण अवस्था आहे. याच वाडीत उन्हाळ्यामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ज्या पाणीदार जिल्ह्यात बाराही महिने भरभरून पाणी असते त्याच जिल्ह्यातील लपलेले हे जळजळीत वास्तव आहे. हे वास्तव मांडण्यासाठी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी पोहोचले थेट सुर्वेवाडीमध्ये. वाचा हा 'ग्राउंड रिपोर्ट'
सुर्वेवाडी. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील डोंगररांगेत वसलेली एक छोटीशी वाडी. बारा वाड्यांची मिळून बनलेल्या वाघवे ग्रुप ग्रामपंचायतमधील जेमतेम १६० लोकसंख्या, ११० मतदार असलेली आणि किल्ले पन्हाळागडच्या पायथ्याशी असणारी ही वाडी. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांहून अधिक काळ झालाय तरीही गावातील परिस्थिती मात्र जैसे थे असून नागरिकांना आजही मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे. वाडीतील सर्वच नागरिकांनी पाण्यासाठी आवाज उठवून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला.
प्रत्येक निवडणुकीला लोकप्रतिनिधी वाडीमध्ये येतात. पाण्याची, रस्त्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन देतात आणि निघून जातात पण निवडणुकीनंतर तेच लोकप्रतिनिधी शेजारहून निघून गेले तरी ओळख दाखवत नाहीत, असे येथील वयोवृद्ध महिला सांगतात.
विशेष म्हणजे वाडीतील शाळकरी मुलंही सकाळी शाळेला जाण्यापूर्वी आणि सायंकाळी परत आल्यानंतर विहिरीवर पाणी आणण्यासाठी नंबर लावत असतात. त्यांची ही दैनंदिनीच झाली आहे. आजूबाजूच्या गावात सर्व सोयीसुविधा आहेत. मात्र आमची वाडी मात्र दुष्काळग्रस्तच असल्याची भावना येथील शाळकरी मुली व्यक्त करतात.