कोल्हापूर:आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा गांधी मैदानावरून निघाला असून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वाररोड, पापाची तिकटी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर वरून जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे. दरम्यान, विद्यमान सरकारने ही पेन्शन योजना लागू करावी एवढीच आपली अपेक्षा आणि मागणी असणार आहे. असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
हजारो कर्मचारी मोर्चात सहभागी: आज दुपारी 12 वाजता येथील गांधी मैदानावरून महामोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रत्येक वेळी सरकारकडून आश्वासन दिले जाते. मात्र कोणताच ठाम निर्णय आजपर्यंत झाला नाही. त्यामुळे आता आम्ही मागे हटणार नाही, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. यापुढच्या काळात सुद्धा तीव्र आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी: चार राज्यांनी हा निर्णय घेतला. आमदार सतेज पाटील म्हणाले की, जुनी पेंशन योजनेबाबत देशातील चार राज्यांनी निर्णय जाहीर केला आहे. आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा ही जुनी पेंशन योजना लागू करावी. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा देत आला आहे. यापुढच्या काळात सुद्धा सरकारकडून हीच अपेक्षा आहे असेही ते म्हणाले. शिवाय आपल्या सरकारच्या काळात सुद्धा ही मागणी सुरू होती. तेंव्हा का शक्य झाले नाही असे विचारले असता ते म्हणाले, मागच्या 15 वर्षांत हे झाले नाही. मात्र कर्मकजाऱ्यांची ही मागणी असून ती मान्य व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. शिवाय हा प्रश्न अशाच पद्धतीने पुढच्या काळात उचलून धरू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी सरकारला दिला.