कोल्हापूर - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यांहून अधिक काळ राज्यभरातील सर्वच मंदिरे बंद आहेत. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर सुद्धा अद्याप बंद आहे. मात्र, गेल्या 6 महिन्यात अंबाबाईचे तब्बल साडे तीन कोटी भक्तांनी ऑनलाईन दर्शन घेतले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मिळालेल्या माहितीवरून ही आकडेवारी समोर आली असून स्वतः सदस्य राजेंद्र जाधव यांनी याबाबत 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या 6 महिन्यांपासून अनेक व्यवसाय आणि उद्योग धंदे सुद्धा बंद अवस्थेत होते. देशभरातील मंदिरेसुद्धा बंद करण्यात आली. मात्र, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी आला आहे, त्या ठिकाणच्या मंदिरांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अद्याप गंभीर आहे. त्यामुळे राज्य शासनाने मंदिरे सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर सुद्धा अजूनही बंद आहे. अगदी नवरात्रौत्सव सुद्धा एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. मात्र, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे असले तरी अंबाबाईच्या भक्तांनी मात्र मोठ्या संख्येने देवीचे ऑनलाइन दर्शन घेतले आहे.