कोल्हापूर - 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दुपारी दोन वाजल्यापासून या लसीकरणाला सुरुवात झाली असून तरुणांनी उत्स्फूर्तपणे या लसीकरणाला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रावर प्रायोगिक तत्त्वावर पुढील 7 दिवस हे लसीकरण सुरू राहणार आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक केंद्रावर जवळपास दोनशे जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला.
नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये -
प्रत्येक केंद्रावर मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केला आहे. तसेच ज्या नागरिकांनी कोविन अॅपवर नोंदणी केली आहे, अशा नागरिकांनाच प्रथमदर्शनी लस मिळणार आहे. अन्यथा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले आहे.
आज प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरणाचा शुभारंभ -
दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत महत्त्वकांक्षी कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थकेअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर, यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचा लसीकरणासाठी समावेश करण्यात आला आहे. कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने घोषित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १ मे २०२१ रोजी प्रायोगिक तत्त्वावर ग्रामीण रुग्णालय शिरोळ, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय कागल, प्राथमिक आरोग्यकेंद्र भेडसगांव ता. शाहुवाडी, भगवान महावीर दवाखना, विक्रमनगर कोल्हापूर या पाच शासकीय संस्थेच्या ठिकाणी १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करुन शुभारंभ करण्यात आला.
हेही वाचा - 'इथे' रोज बसते माणुसकीच्या भावनेची पंगत, सेवा निलयंम संस्थेचा उपक्रम