कोल्हापूर - जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे. कागल एमआयडीसीमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे दुपारी एक वाजता ही सभा होईल. दरवर्षी सभेमध्ये मोठा गोंधळ बघायला मिळत असतो. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये असलेला टोकाचा संघर्ष या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येतो. म्हणूनच सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही पद्धतीने गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांनी सुद्धा जोरदार तयारी केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
गोकुळची आज सर्वसाधारण सभा, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात हेही वाचा -अंबाबाई मंदिर किरणोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत
सभेमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष
आमदारकीचे तिकीट नको पण गोकुळचे संचालक पद द्या, असे गोकुळबाबत बोलले जाते. गेल्या काही वर्षांपासून गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून सत्ताधारी गटाला गोकुळच्या हिशोबाने प्रश्न विचारले जातात आणि त्याला हवी तशी उत्तरे मिळत नसल्याचे वारंवार विरोधक सांगत आले आहेत. शिवाय, सभास्थळी मोठा गोंधळ पाहायला मिळत असतो. यावर्षीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांना द्यावी लागतील, असे म्हणत मोठ्या प्रमाणात सभासदांनी सभेमध्ये प्रश्न उपस्थित करावे, असे आवाहन गोकुळ बचाव कृती समितीकडून करण्यात आले आहे.
इतका पोलीस बंदोबस्त तैनात
सभेमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षी पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. कडेकोट पोलीस बंदोबस्ताबरोबरच याठिकाणी प्रत्येक सभासदाला तपासून सभास्थळी सोडावे लागत असते. यावर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी तर सभास्थळावरील सर्वच खुर्च्या दोरीने बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाही जवळपास 2 डीवायएसपी, 3 पोलीस निरीक्षक आणि सव्वाशेहून अधिक पोलीस सभास्थळी तैनात करण्यात आले आहे.
गोकुळची आज सर्वसाधारण सभा हेही वाचा -कळंबा कारागृहात पोलीसच देतात आरोपींना निरोपाच्या चिठ्ठ्या; चौकशी सुरू