कोल्हापूर - नुकतीच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक पार पडली. यामध्ये सत्ताधारी गटाला धूळ चारत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने बाजी मारली. मात्र आता सर्वांचे लक्ष गोकुळचा नवा अध्यक्ष कोण होणार याकडे लागून राहिले आहे.
येत्या 14 मे रोजी अध्यक्ष निवड होणार असून विश्वास उर्फ आबाजी पाटील किंव्हा अरुण डोंगळे यांच्याच नावाची चर्चा आहे. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नूतन संचालकांना याबाबतच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. अध्यक्ष निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून वैभव नावडकर काम पाहणार आहेत.
नवीन आव्हान; अनुभवींना अध्यक्षपदाची धुरा -
गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळमध्ये महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके गटाची सत्ता आहे. मात्र अनेक मुद्यांवरून पालकमंत्री सतेज पाटील यांनी लढा दिला होता. शिवाय दूध उत्पादकाला जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल याबाबत सुद्धा ते वारंवार बोलत होते. त्यामुळे उत्पादकांनी त्यांना संधी दिली असून त्यांच्यासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दूध उत्पादकांना दोन रुपये जादा कसे देता येईल याबाबत आत्तापासूनच चर्चा करत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी अध्यक्ष पदाची धुरा अनुभवी व्यक्तीवरच सोपविण्यात येणार असून गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या नावाची चर्चा आहे. दोघांनीही सत्ताधारी गटाला रामराम ठोकून सतेज पाटील यांच्या गटाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्यानेच विरोधी गटाचा विजय सुकर बनला होता. त्यामुळे दोघांपैकी एकाचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.