कोल्हापूर - गोवा बनावटीच्या दारूसह 32 लाख 8 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भुदरगड तालुक्यातील कुर गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क, भुदरगड पोलीस आणि गुन्हा अन्वेषण शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई केली. वाहनचालक हरिश केशव गौडा याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये गोवा बनावटीच्या दारूसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त गारगोटी रस्त्यावरून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार आहे. यासंदर्भातील माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी भुदरगड तालुक्यातील कुर गावच्या हद्दीत कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर बस स्थानक चौकात सापळा रचला. रात्री दहाच्या सुमारास माल वाहतूक टेम्पो येत असल्याचे दिसले. अधिकाऱ्यांनी ते थांबवून वाहनात काय आहे? अशी विचारणा करत तपासणी केली.
यात प्रथमदर्शी वाहनाचा हौदा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसून आले. मात्र, वाहनाची कसून तपासणी केली. यात हौद्यामध्ये वरती असलेल्या पत्र्याच्या प्लेटा आढळून आल्या. अधिक तपासणी केली असता, या पत्र्यांच्या प्लेटा काढल्यानंतर आतील कप्प्यात विविध कंपन्यांचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळले. यामध्ये 750 मिलीच्या बाटल्या असलेले एकूण 361 बॉक्स मिळाले.
हेही वाचा -व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे; शरद पवारांकडे व्यापाऱ्यांची मागणी
बाजार भावानुसार त्याची 23 लाख 3 हजार 760 इतकी किंमत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे आणि जवान सचिन काळे, संदिप जानकर, सागर शिंदे, जय शिनगारे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अजित वाडेकर, ओंकार परब, सुनील केंबळेकर, विजय तळस्कर, अमर वासुदेव, भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, दयानंद देणके यांनी संयुक्तरित्या केली.