कोल्हापूर - कोल्हापूरमधील जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे आज मंगळवार (दि. ३)रोजी येथील जयसिंगपूरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. जाधव यांनी सुमारे ५० वर्ष महाराष्ट्रात फिरून शस्त्रांचा मोठा साठा निर्माण केला होता. यामध्ये शस्त्रास्त्रे आणि प्रात्यक्षिके हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्याकडे प्रामुख्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांचा मोठा संग्रह होता. याबरोबरच गडकोट-किल्ल्यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत.
महाविद्यालयीन दशेपासूनच संग्रहाची गोडी
गिरीश जाधव हे मुळचे कोल्हापुर येथील हातकणंगले तालुक्यातल्या जयसिंगपूरचे रहिवासी होते. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक जयसिंगपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण जाधव हे त्यांचे वडील. सुरुवातीला मुंबईत बीई केमिकल इंजिनिअरिंग आणि नंतर मार्केटिंग क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या गिरीश जाधव यांना इतिहास प्रेमातून दुर्मिळ शस्त्रास्त्रांच्या संग्रहाचा छंद जडला. गिरीश जाधव यांना गडकिल्ले, शस्त्रास्त्रे आदींचे मोठे कुतूहल आणि त्याचा संग्रह करण्याबाबत प्रचंड इच्छा होती. पुढे जाऊन त्यांना याचा प्रचंड छंद जडला. कॉलेजवयात असल्यापासूनच त्यांना संग्रह करण्याची आवड लागली होती. स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडूनही त्यांना याबाबत मोठे मार्गदर्शन लाभले होते. नंतर त्यांनी जयसिंगपूर येथून मुंबईमध्ये वास्तव्यास गेले. त्याठिकाणीही त्यांच्या संग्रहात प्रचंड झाली.