कोल्हापूर: शहरात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडल्याने, मोठ्या प्रमाणात धरणाचे पाणी पंचगंगा नदीमध्ये येत होते. त्यामुळे पंचगंगा आपली धोका पातळी गाठेल या अनुषंगाने प्रशासन देखील सतर्क झाले होते. त्यामुळे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. तसेच अनेक मार्ग देखील बंद करण्यात आले होते. मात्र सुदैवाने पाऊस थांबल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ न झाल्याने कोल्हापूरवरील महापुराचा धोका टळला आहे. तर स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांना उद्या पुन्हा त्यांच्या घरी सोडण्याचे तसेच बालिंगा पूल सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थलांतर नागरिकांना पाठवणार घरी: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, यामुळे मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनाने पुराचा फटका बसणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच काही कुटुंबांना स्थलांतर देखील केले होते. तर शाळा देखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. मात्र सुदैवाने काल पावसाने काही काळ उसंत घेतली, यामुळे राधानगरी धरणाचे पाणी पंचगंगेत आले तरी काही इंच पाणी वाढले. यामुळे कोल्हापूरवर आलेले महापुराचे संकट आता टळले आहे. स्थलांतर केलेल्या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत आढावा घेऊन, उद्या पुन्हा त्यांच्या घरी पाठवू असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले. तसेच अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेल्या शाळा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच ज्या शाळामधील परीक्षा रद्द झाली आहे, त्यांची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.