कोल्हापूर :आज आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार असून मंगळवारपासून श्रावण महिन्याला सुरवात होणार आहे. त्यामुळे मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात गटारी अमावस्या साजरी करण्याचा बेत आखला जात आहेत. चिकन मटणासोबतच मासळी खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच मटण बाजारात गर्दी केली आहे. सध्या पावसाळा असल्याने खवय्यांसाठी ताजी मासळी उपलब्ध होत आहे. मासेप्रेमींसाठी ही खास पर्वणी ठरली आहे. कोल्हापूर म्हटले की, प्रत्येक कोल्हापूरकरांच्या घरी चिकन, मटणासोबत लाल, पांढरी, सोल करी असते, मात्र आता श्रावण सुरू होणार असल्याने मांसप्रेमींसाठी हा शेवटचा रविवार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
मटण बाजारात नागरिकांची गर्दी : श्रावण महिना हिंदूंसाठी पवित्र मानला जातो. कारण श्रावण महिन्यापासून हिंदू सण सुरू होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक लोक मांसाहार वर्ज्य करतात. कोल्हापूर हा मांसप्रेमीचा जिल्हा आहे. जेथे प्रत्येक रविवारी घरी मटण, चिकन असते. परंतु पावसाळ्यात बरेच लोक ताजे मासे खाण्यासाठी मटण मार्केटला भेट देतात. मंगळवारपासून श्रावणमास सुरू होणार असल्याने आज सकाळपासूनच मटण बाजारात अनेक मांसप्रेमींनी गर्दी केली होती. श्रावण महिना सुरू झाल्याने मटण, चिकन खाणे शक्य नसल्याने आज सुट्टी असल्याने अनेकांनी कोल्हापुरी स्पेशल टोंबक व्हाईट ग्रेव्ही चिकन मटण आणि मासेसोबत खाण्याचे बेत आखले आहेत.