कोल्हापूर : Ganeshotsav २०२३ : कोणताही उत्सव हा पर्यावरणाची हानी (Kolhapur Ganeshotsav २०२३) करणारा नसावा, यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना (Ganeshotsav २०२३) पुढे आली. मात्र, काळाच्या पुढं असलेल्या कोल्हापुरात 1887 साली म्हणजेच 136 वर्षांपूर्वी कागदी लगद्यापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती (Eco Friendly Ganpati Kolhapur) साकारली होती. ही मूर्ती अजूनही सुस्थितीत असून, कोल्हापुरातील मोहिते पार्क इथल्या लोकमान्य हॉल येथे प्रतिष्ठापित केलेली आहे. काळाप्रमाणं गणेशोत्सवाचं स्वरूप जरी बदललं असलं तरी 136 वर्ष जुन्या 'चंद्राकांत गणेश मूर्ती'ची (Chandrakant Ganpati Kolhapur) भक्तांच्या मनातील जागा कोणीही घेऊ शकली नाही.
1887 साली गणेश मूर्ती केली तयार : रत्नागिरी जिल्ह्यातील मावळगचे वासुदेव वामन सरदेसाई हे कोल्हापुरात स्थायिक होते. कोकणातील मोठा सण म्हणून आजही गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. त्यापैकीच सरदेसाई कुटुंबिय होते. कोल्हापुरातून खास गणेशोत्सवासाठी गावी जाण्यापेक्षा घरातच मूर्ती बनवण्याचा मनोदय पत्नी लक्ष्मीबाई यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार मुंबईचे प्रसिद्ध मूर्तीकार दिवंगत बोंद्रे यांच्या कारागिराकडून 1887 साली गणेश मूर्ती बनवून घेण्यात आली होती.
एकाच ठिकाणी 21 गणपतीचं दर्शन होतं : कोल्हापुरातील शिवाजी पेठेत असणाऱ्या सरदेसाई यांच्या वाड्यात त्याकाळी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सभोवताली मांडलेल्या 21 आरशांमधून या मूर्तीची 21 प्रतिबिंब दिसत होते. त्यामुळं कोल्हापूरकरांना 21 गणपतींचं दर्शन घेतल्याची श्रद्धा होती. कालांतरानं सरदेसाई कुटुंबियांनी कोल्हापूर सोडलं. त्यानंतर ही मूर्ती शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर प्रशासनाच्या अखत्यारीत होती. मात्र, शिवाजी मंदिराचं नूतनीकरणाचं काम सुरू झाल्यानंतर ही मूर्ती ठेवायची कुठे? असा प्रश्न उभा राहिला. यावेळी कोल्हापुरातील मोहिते पार्क येथील लोकमान्य सांस्कृतिक व परिसर मंडळानं मूर्तीची जबाबदारी स्वीकारत 9 डिसेंबर 2014 रोजी मोहिते पार्क येथे या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.