कोल्हापूर :गणेशोत्सवासाठी एक महिना बाकी असल्याने गणेश मंडळांची तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाकडूनही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी केली जात आहे. या उत्सवादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सदैव तैनात असते. गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्ह्यातील सर्व साउंड मालक-चालक व ऑपरेटर्सची बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी साऊंड ऑपरेटर्सला कायद्याचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस प्रशासनाची तयारी : पोलीस अधीक्षक आणि साउंड ऑपरेटर्स यांची बैठक कोल्हापुरातील अलंकार हॉल येथे झाली. या बैठकीला जिल्हा पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उप अधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव यांच्यासह आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी फक्त एक महिना बाकी असून सर्व गणेश मंडळ तयारीला लागले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनदेखील तयारीला लागले आहेत. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांना विविध परवानग्या तसेच नियम घालून देण्यात आले आहेत. गणेश जयंती दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांविषयी नियम या बैठकीत सांगण्यात आले.
चेक पोस्ट : या बैठकीत बोलताना, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या सर्वांना कायद्याचे महत्त्व सांगितले. नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहनही साउंड ऑपरेटर्सला केले. जिल्हा बाहेरुन येणाऱ्या साउंड सिस्टिमला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
364 दिवस आमचे : गतवर्षी गणेश विसर्जनच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाले होते. विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक पुढे न सरकल्याने मिरवणूक तब्बल 2 दिवस चालली होती. तर लेझर लाईटमुळे अनेकांच्या डोळ्यांना दुखापत झाल्याच्या घडना घडल्या. तसेच मोबाईलचे कॅमेरेदेखील खराब झाले होते. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. साउंड सिस्टीमबाबत घालून दिलेल्या नियमाचे पालन झाले पाहिजे. कार्यकर्त्यांचा कितीही दबाव आला तरी कायद्यानुसार 45 डेसिबलच्या वरती डॉल्बी किंवा साउंडचा आवाज जाता कामा नये, याची काळजी व्यावसायिकांनी घ्यावी. अन्यथा कारवाई केली जाईल,असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. एक दिवस तुमचा असेल, पण 364 दिवस आमचे आहेत. लक्षात ठेवा, आमच्याशी पंगा घेऊ नका, असा इशाराच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी दिला.
असे आहेत नियम व अटी:
- प्रत्येक मंडळाने मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
- मंडळाने परवानगी घेतली आहे का नाही, याची खात्री साउंड चालकांनी करावी. त्यानंतरच त्यांची सुपारी घ्यावी.
- मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा परवाना असणे बंधनकारक आहे.
- परवाना नसल्यास ड्रायव्हर आणि मालक दोघांनाही प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आकरण्यात येईल.
- ट्रॉलीवरील देखावा उभारण्यासाठी करण्यात आलेले स्ट्रक्चर हे 3 मीटरपेक्षा जास्त मोठे नसावे.
- स्ट्रक्चर हे केवळ 8 बाय 10 मध्ये उभा करावे.
- मंडळांना सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळावी यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार. हे नियम पाळून सर्वांनी पोलीस प्रशासना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी केले.
हेही वाचा-
- ZP School: आता शाळांमध्ये शिक्षकांना मोबाईल बंदी, निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू
- Sharad Pawar In Kolhapur: पक्षफुटी नंतर शरद पवार यांची कोल्हापुरात 25 ऑगस्टला जाहीर सभा