कोल्हापूर - प्रत्येक युवतीला तिचे केस किती प्रिय असतात हे सांगायची काही वेगळी गरज नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या सुखासाठी हेच केस दान करून आपले सौंदर्य काही काळासाठी गमावण्याचे धाडस करताना फारच कमी मुली पाहायला मिळतात. पण, कोल्हापुरातल्या एका युवतीने आपले हेच सुंदर आणि लांबलचक केस कॅन्सरग्रस्तासाठी दान केले आहेत. होय, गंधाली भंडारे असे या युवतीचे नाव आहे. कोल्हापुरातल्या इचलकरंजी मधील 20 वर्षांची ही युवती. सध्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. कीमोथेरेपी सुरू असताना कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केस जातात. अशा वेळी त्यांना मानसिक आधार मिळावा म्हणून आपले स्वतःचे केस विग बनवण्यासाठी तिने दान केले आहेत.
'तिने' कॅन्सरग्रस्तासाठी केले केस दान खरंतर अनेक ठिकाणांहून आता कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुली केस दान करण्यासाठी पुढे येताना पाहायला मिळत आहेत. गंधालीच्या माध्यमातून कोल्हापूरसुद्धा आता या सामाजिक कार्यात मागे राहिले नसल्याचे दिसून आले आहे. एक वीग बनवण्यासाठी किमान 12 ते 14 इंची इतक्या लांबीचे केस लागतात. जवळपास सहा ते सात मुलींनी दान केलेल्या केसांपासून एक विग तयार करण्यात येतो. त्यामुळे मुलींना संपूर्ण केस दान करण्याची गरज नसल्याचं गंधालीने म्हटले आहे.
पुण्यातील मदत चॅरिटेबल ट्रस्टने 'कोप विथ कॅन्सर' या उपक्रमाच्या माध्यमातून अशा पद्धतीने केस दान करणाऱ्या मुलींना मार्गदर्शन करून विग बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याच संस्थेकडे गंधाली आता आपले केस कुरियरने पाठवणार आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी कोल्हापुरातील 'नो शेव्ह नोव्हेंबर' या मुलांच्या मोहिमेत सुद्धा गंधाली गेल्या दोन वर्षांपासून सहभाग घेत आली आहे.
वीग बनविण्यासाठी ठराविक पद्धतीनेच केस कापावे लागतात. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. ही सर्व काळजी घेत गंधाली ने आज कोल्हापुरातील एका सलून मध्ये आपले केस कापले. यावेळी सलूनच्या मालकांनी सुद्धा तिचा हा उपक्रम ऐकून तिच्या उपक्रमात खारीचा वाटा उचलत मोफत केस कापले. शिवाय, अशा पद्धतीने समाजात अनेक युवतींनी पुढे येऊन कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या वेदना वाटून घेता येत नसल्या तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करता येऊ शकते. गंधालीने ज्याप्रमाणे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आपले केस दान करत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे, असाच आधार देण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे.