कोल्हापूर - ज्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ सफाई कर्मचारी म्हणून काम केलं, त्याच ग्रामपंचायतीमध्ये आता सदस्य म्हणून मतदारांनी एका आजीबाईंना पाठवले आहे. कोल्हापुरातल्या गडमुडशिंगी गावातील नागरिकांनी हे शक्य करून दाखवले असून द्रौपदी रामचंद्र सोनूले असे या आजीबाईंचे नाव आहे. निवडून येताच काय म्हंटलं आहे आजीबाईंनी पाहुयात.
'जिथं सफाई कर्मचारी म्हणून गेले ४० वर्ष दररोज जायला लागायचं तिथं आता सदस्य म्हणून जाणार' - सफाई कर्मचारी आजीबाई बनल्या ग्रामपंचायत सदस्या
ज्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ सफाई कर्मचारी म्हणून काम केलं, त्याच ग्रामपंचायतीमध्ये आता सदस्य म्हणून जाताना कसं वाटते, सांगत आहेत नुतन ग्रामपंचायत सदस्या असलेल्या आजीबाई..
गडमुडशिंगी गावचा आदर्श -
करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी या गावात गेल्या अनेक वर्षांपासून द्रौपदी सोनूले सफाई कर्मचारी म्हणून काम करत आल्या आहेत. गावातील परिसर झाडून काढण्यापासून गटर साफ करण्यापर्यंत सगळी कामं त्या करत होत्या. त्यांनी गावासाठी दिलेल्या या योगदानाबद्दलच माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी द्रौपदी सोनूले यांना ग्रामपंचायत सदस्य बनवायचं ठरवलं. आपल्या पॅनेल मधील सर्वांशी चर्चा करून त्यांना तिकीट दिलं आणि आजीबाई मोठ्या मताधिक्याने निवडून सुद्धा आल्या. ग्रामपंचायतमधील कर्मचारी वर्षानुवर्षे गावाची सेवा करत असतात. मात्र त्यांना सदस्य बनविल्याचे आजपर्यंत कोल्हापुरात उदाहरण पाहायला मिळाले नव्हते. मात्र गडमुडशिंगी गावातील नागरिकांनी एका कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत सदस्य बनवून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे.