कोल्हापूर : G20 Summit: आकर्षक आणि मजबूत कोल्हापुरी चप्पल सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र असते. परदेशातही ही चप्पल विकली जाते. अस्सल चामड्यापासून बनवलेल्या तसेच चप्पलवरील कलाकुसरीमुळे कोल्हापुरी चपलेचं सौंदर्य अधिकच खुलते. (Kolhapuri Chappal) राजधानी दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेच्या (G20 Summit In Delhi) निमित्तानं भरणाऱ्या हस्तकला बाजारात खास कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यामुळे परदेशी पाहुण्यांनाही देखणी कोल्हापुरी चप्पल आता भुरळ घालणार आहे.
पैठणी साडीचं वैशिष्ट्य : (Importance of Paithani Saree) दिल्लीच्या प्रसिद्ध प्रगती मैदानाच्या भारत मंडपात 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान हा हस्तकला बाजार भरेल. देशभरातील प्रत्येक जिल्ह्याची ओळख असलेल्या हस्तनिर्मित वस्तू या बाजारात विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. शुद्ध रेशीम आणि सोनेरी जरीमध्ये विणकाम व दोलायमान रंग हे महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणी साडीचं वैशिष्ट्य आहे. (Paithani Saree) गोदावरीकाठी असलेल्या पैठणमध्ये तयार होणाऱ्या पैठणीचे काठ आणि पदर आकर्षक डिझाईनचे असतात. यामध्ये हातानं विणलेले सोनेरी पोपट, फुले, बैल, कमळ, मोर आदींचा समावेश असतो. नऊवारी किंवा सहावारी पैठणी स्त्रियांचं सौंदर्य अधिकच खुलवते. यात चंबा रुमाल, मधुबनी पेंटिंग्ज, लाख बांगड्या, तंजावर पेंटिंग्जपासून पैठणी साडी, कोल्हापुरी चप्पलपर्यंत अनेक उत्पादनांचं प्रदर्शन व विक्री होईल.
'एक जिल्हा, एक उत्पादन': जी २० परिषदेच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्य व केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या प्रत्येक उत्पादनाची बाजारपेठ क्षमता वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या बाजाराच्या माध्यमातून देशभरातील सर्वोत्कृष्ट हस्तकला वस्तू एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध होतील. 'एक जिल्हा, एक उत्पादन' (ओडीओपी) योजनेंतर्गत उत्पादनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.