कोल्हापूर- 'तुम जमीन वालोपर रेहम करो, अस्मानवाला तुमपर रेहम करेंगा!' या उदात्त हेतूने कोल्हापुरातील मुस्लीम बांधव हिंदू बांधवांच्या मदतीला धावत आहेत. कोरोनामुळे आपले सुद्धा परके झाले आहेत. कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, त्याचे नातेवाईक देखील त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देतात. अशा वेळी हेच मुस्लीम बांधव आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हिंदू लोकांवर अंत्यसंस्कार करत आहेत. पाहुयात ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.
पुरोगामी शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कृतीतून आणि विचारातून नीतिमूल्ये या मातीत रुजवली, आणि त्याचा वारसा आजही कोल्हापूरकर चालवत आहेत. कोरोनामुळे सध्या जगात हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस कोल्हापुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. वाढत्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना धीर देण्याची गरज आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी गरजू व्यक्तींसाठी रस्त्यावर उतरली आहे.
हिंदू, शीख, बौद्ध धर्मांच्या लोकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार
कोरोनामुळे अनेकांनी आपले खरे रूप दाखवले. अनेकांनी आपले नाते वाऱ्यावर सोडून दिले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडू लागल्या. पण मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून बैतुलमाल कमिटीने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व जातीच्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या, नातेवाईक नसणाऱ्या तसेच नातेवाईक असून सुद्धा अंत्यसंस्काराला न येणाऱ्या व्यक्तीवर त्याच्या धर्मातील प्रथेनुसार कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांकडून अत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
'अशी' जपली माणूसकी
कोल्हापुरातील एक घटना अशी की, एक व्यक्ती अलगीकरणात असताना त्याचा मृत्यू झाला, त्याचे नातेवाईक त्याला सोडून गेले. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली, या सर्व प्रकाराची माहिती फोनवरून बैतुलमाल कमिटीच्या सदस्यांना मिळाली. माहिती मिळताच सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, व त्या मृतदेहावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले.
कॉल येताच घटनास्थळी दाखल