कोल्हापूर - आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वीरपुत्र ऋषीकेश जोंधळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषीकेश यांचे चुलत भाऊ दीपक जोंधळे यांनी ऋषीकेषच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सीमेवर लढताना वीरमरण आलेला पुत्र आज अनंतात विलीन झाला.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले. ऋषीकेश यांचे पार्थिव आज पहाटे कोल्हापूरमध्ये दाखल झाले. यावेळी मराठा बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सकाळी साडे सातच्या सुमारास बहिरेवाडी या ऋषीकेश यांच्या मूळगावी पार्थिव आणण्यात आले. त्यांच्या घरासमोर पार्थिव ठेवल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. अवघ्या वीस वर्षांच्या या जवानाचे अंत्यदर्शन घेताना अनेकांच्या अश्रूंना बांध फुटला. त्यानंतर गावात अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी 'ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
अंत्ययात्रा भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानात आल्यानंतर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. याठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, समरजीत घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर चुलत भाऊ दिपक जोंधळे यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी भारत 'माता की जय'चा जयघोष झाला.
भाऊबीजेच्या दिवशी पार्थिवाला ओवाळले..
आज भाऊबीज असल्याने बहीण आणि भावाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हुतात्मा ऋषीकेश यांनाही कल्याणी नावाची बहीण आहे. मात्र या दुर्दैवी बहिणीवर ऋषीकेश यांच्या पार्थिवाला ओवाळण्याची वेळ ओढावली.हा प्रसंग पाहताना उपस्थितांना अश्रूंचा बांध फुटला.
दिवाळी तोंडावर आली की जवान ऋषिकेश जोंधळे लहानपणी शिवरायांचा पुतळा डोक्यावर घेऊन फिरायचा. त्याच छत्रपती शिवाजी गल्लीतून आज त्याची अंत्ययात्रा निघाली. यामुळे सर्वांनाच गहिवरून आले. अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी अश्रूंना वाट करून दिली. दरवर्षी दिवाळीत गल्लीतून फिरणारा ऋषिकेश आज मात्र लष्करी इतमामात जगाचा निरोप घेतोय, देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान नादगरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.