कोल्हापूर - काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यांनी केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना वीरमरण आले. संग्राम पुढच्या महिन्यात आपल्या गावी येणार होते. मात्र, पार्थिवच घरी आल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि बालमित्रांवर शोककळा पसरली आहे. माझा मित्र देशासाठी हुतात्मा झाला याचा अभिमान असल्याची भावना त्यांच्या बालमित्रांनी व्यक्त केली.
संग्राम पाटील यांच्या मित्रांनी जाग्या केल्या आठवणी गावी आल्यावर फिरायला जाऊ -
हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्या नोकरीचा कालावधी संपला होता. मात्र, त्यांनी आणखी दोन वर्ष नोकरी वाढवून घेतली होती. दिवाळीमध्ये सुद्धा संग्राम पाटील गावी परतले नव्हते. मात्र, येत्या १ डिसेंबर रोजी ते आपल्या गावी येणार होते. गावातल्या आपल्या मित्रांना सुद्धा त्यांनी सुट्टीवर आल्यावर बाहेर फिरायला जाऊ, पार्टी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आता संग्राम पुन्हा कधीच आपल्यासोबत नसणार, हे लक्षात येताच मित्रांना अश्रू अनावर झाले.
लाडू बनवतानाचा व्हिडीओ -
संग्राम पाटील गावी येण्याची सर्वच मित्र आतुरतेने वाट पाहत होते. काश्मीरमध्ये जवान लाडू बनवत असतानाचा व्हिडीओ संग्राम यांनी मित्रांना पाठवला होता. त्या व्हिडीओमध्ये संग्राम यांना शेवटचे पहिल्याचे त्यांच्या बालपणीच्या मित्रांनी सांगितले.
गावातील पहिलाच जवान शहीद -
निगवे खालसा गावातील जवळपास 100 जवान आजपर्यंत देशसेवेत उतरले आहेत. त्यातील 10 ते 15 जवान सेवानिवृत्त झाले असून अजूनही 80हून अधिक जवान देशसेवेसाठी कार्यरत आहेत. मात्र, संग्राम पाटील हे पहिलेच जवान आहेत. ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. संग्राम यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संग्राम पाटील सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन, मुले असा परिवार आहे. एकाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाल्याची ही दुसरी घटना आहे.