कोल्हापूर -जिल्ह्यामध्ये दररोज 40-50 कोरोना रुग्ण वाढत असताना आज अतिशय दिलासादायक बातमी आली आहे. आज तब्बल 49 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 25 रुग्ण वाढले असले तरी 49 जणांना डिस्चार्ज दिल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 91 वर पोहोचली आहे.
कोल्हापुरात आज 49 जणांची कोरोनावर मात; अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 332 - कोल्हापूर कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज दिवसभरात 25 रुग्ण वाढले असले तरी 49 जणांना डिस्चार्ज दिल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 91 वर पोहोचली आहे.
आज दिवसभरात वाढलेल्या 25 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. गडहिंग्लजमध्ये आज एकूण 14 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. शाहूवाडीमध्ये आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 136 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 427 झाली आहे. त्यापैकी 91 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीला जिल्ह्यात आता 332 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांची आकडेवारी पाहता यामध्ये 21 ते 50 वयोगटातील रुग्णांची संख्या 291 आहे. दरम्यान, आज दिवसभरात 252 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 226 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.