कोल्हापुरात पार पडली दुर्ग परिषद; राज्यभरातील विविध संस्थांचे पदाधिकारी होते उपस्थित - दुर्ग परिषद कोल्हापूर
राज्यातील 350 गडकिल्ल्यांबाबत या दुर्ग परिषदेमध्ये चर्चा पार पडली असून तब्बल 225 संस्थांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. आज सकाळी 11 वाजता भवानी मंडप येथील मुख्य राजाराम महाविद्याल येथे युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या परिषदेला सुरुवात झाली.

कोल्हापूर- अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आज कोल्हापुरात दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 350 गडकिल्ल्यांबाबत या दुर्ग परिषदेमध्ये चर्चा पार पडली असून तब्बल 225 संस्थांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. आज सकाळी 11 वाजता भवानी मंडप येथील मुख्य राजाराम महाविद्याल येथे युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या परिषदेला सुरुवात झाली. त्यानंतर समारोपाला खासदार संभाजीराजे यांनी उपस्थिती लावली आणि परिषदेत करण्यात आलेले ठराव सर्वानुमते मंजूर केले.
दोन वर्षांपूर्वी रायगडावरसुद्धा पार पडली दुर्ग परिषद -
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर दुर्ग परिषद घेण्यात आली होती. यामध्ये पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि वन विभागासह दुर्गसंवर्धन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या परिषदेनंतर राज्यात दुर्ग संवर्धनाच्या चळवळीला वेग आला होता. किल्ले रायगडनंतर होणाऱ्या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडाबाबतची माहिती आदींबाबत आज दिवसभर सविस्तर चर्चा झाली. शिवाय दुर्ग संवर्धनाबाबत महत्त्वाचे निर्णय पार पडले असून खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत महत्त्वाचे ठराव सुद्धा केले गेले आहेत.
विविध गडकिल्ल्यांची माहिती मोबाईल ॲपद्वारे डिजिटल स्वरूपात संकलित -
दुर्ग परिषदेदरम्यान संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून राज्यातील विविध प्रकारच्या जलदुर्ग, भुईकोट किल्ले व दुर्ग यांची माहिती एकत्रित करून ती मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे. त्यासाठी आज उपस्थित प्रत्येक दुर्ग अभ्यासकांकडून माहिती गोळा केली गेली आहे.