कोल्हापूर - बिबट्याच्या तीन नख्या, एका वन्य प्राण्यांचे काळीज आणि एका बंदुकीसह भुदरगड तालुक्यातील माजी पोलीस पाटलाला अटक करण्यात आली आहे. वसंत महादेव वास्कर (वय 55, रा. मौजे शिवडाव, ता. भुदरगड) असे या माजी पोलीस पाटलाचे नाव आहे. आज (शुक्रवार) दुपारी त्याच्या राहत्या घरी छापा टाकून वन विभागाने ही कारवाई केली आहे.
गुप्त माहितीवरून छापा -
कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील मौजे शिवडाव गावातील माजी पोलीस पाटील वसंत महादेव वास्कर यांच्याकडे बिबट्याची नखे आणि एका अज्ञात वन्य प्राण्याचे काळीज असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार आज (शुक्रवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरावर वनविभागाच्या एका पथकाने छापा टाकला. यावेळी त्याच्या घरातील स्वयंपाक घरात हळदीच्या डब्यात बिबट्याच्या तीन नख्या लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. घराची अधिक झडती घेतली असता त्यांच्या घरातील फ्रीजमध्ये एका अज्ञात वन्यप्राण्याचे काळीज ठेवल्याचे अधिकाऱ्यांना मिळून आले. जवळपास 720 ग्राम वजनाचे हे काळीज आहे. शिवाय बारा बोअर बंदूक आणि 13 जिवंत काडतुसे सुद्धा अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यांच्याकडून हे सर्व हस्तगत केले असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित पोलीस पाटलाने यापूर्वी बिबट्याच्या दोन नख्या एका व्यक्तीला विकल्या असल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे.