कोल्हापूर - यावर्षी सुद्धा कोल्हापुरात महापुरामुळे आंबेवाडी आणि चिखली गावातील नागरिकांना महापुराचा मोठा फटका बसला. 2019 मध्ये गावातील अनेकांची घरं कोसळली अनेकांची जणावरं वाहून गेली. यापूर्वी सुद्धा या दोन्ही गावांमध्ये मोठं नुकसान झाले होते. त्यामुळे इथल्या रहिवाशांना कायमस्वरूपी स्थलांतर करण्यासाठी जागा देण्यात आल्या आहेत. प्रत्येकवेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते मग तरी सुद्धा इथले नागरिक स्थलांतर का करत नाहीत, याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
पूर बाधितांना जागा दिली तरी स्थलांतर नाहीच, चिखलीतील गावकऱ्यांच्या आहेत अनेक समस्या - कोल्हापूर महापूर न्यूज
2019 नंतर यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात महापुराचा फटका नागरिकांना बसला आहे. यावर्षी तर केवळ 3 ते 4 दिवसात झालेल्या पावसात 2019 पेक्षाही मोठा महापूर आला. तीन दिवसांच्या पावसाने इतका मोठा पूर येत असेल तर याला काहीतरी इतर गोष्टी सुद्धा कारणीभूत आहेत, असे इथंल्या नागरिकांनी म्हंटले आहे. शिवाय कोल्हापूर रत्नागिरी मार्ग तसेच पुणे बंगळुरू महामार्गाची उंची सुद्धा वाढली असल्याने एकप्रकारे नदीच्या प्रवाह बदलास कारणीभूत ठरला आहे.
2019 च्या तुलनेत कमी नुकसान :
यावर्षी सुद्धा गावातील अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. 2019 मध्ये शंभरच्या आसपास घरं जमीनदोस्त झाली होती. यावेळी सुद्धा अनेकांची घरं पडली असल्याने नागरिक रस्त्यावर आले आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या महापुरात आलेल्या पाण्याचा अंदाज असल्याने आणि प्रशासनाच्या वेळोवेळी मिळालेल्या सुचनेमुळे अनेक नागरिकांनी स्थलांतर केले होते तर जनावरांना सुद्धा सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते. त्यामुळे 2019 च्या तुलनेत यावर्षीच्या महापुरात कमी नुकसान झाले आहे.