कोल्हापूर -कोल्हापुरात 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे पुराचा सर्वाधिक फटका ज्या गावाला बसतो त्या चिखली गावातील ( Chikhali village Kolhapur ) नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली असून आजपासूनच आपल्या जनावरांना सुरक्षितस्थळी हलवायला सुरुवात केली आहे. एनडीआरएफच्या ( NDRF Squad Kolhapur ) जवानांनी सुद्धा एकूण पुरस्थितीची पाहणी केली आहे. सद्यस्थितीत पंचगंगा नदीची पाणीपातळी 32.1 फूट इतकी आहे. अजूनही इशारा पातळी गाठायला 7 फूट बाकी आहे, तरीही नागरिकांनी खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरातील सद्यस्थितीवर एक नजर...
आज ( गुरुवारी ) दिवसभरात पावसाची उघडझाप :पुढचे तीन दिवस कोल्हापूरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदी इशारा पातलीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात महापुराची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. असे असतानाच काल दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याचा वेग मंदावला आहे. आज दिवसभर सुद्धा पावसाची उघडझाप सुरू आहे. मात्र तरीही एक इंच सुद्धा पाणीपातळी वाढली नाहीये. याउलट पाणी पातळी जवळपास 4 ते 5 इंचांनी कमी झाली आहे. सद्यस्थितीत पंचगंगा 32.1 फुटांवरून वाहत आहे. इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. त्यामुळे ही पाणीपातळी गाठण्यासाठी अद्यापही 7 फुटांची गरज आहे. त्यामुळे एकीकडे मुसळधार पावसाचा इशारा दिला असताना पावसाची उघडझाप सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ थांबली आहे. जर उद्यापासून 9 जुलैपर्यंत जोरदार पाऊस झाला तर पुन्हा पाणीपातळी वाढू शकते. त्यामुळे कोणीही निष्काळजीपणा करू नका, प्रशासनाच्या सर्वच सूचनांचे पालन करा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. दरम्यान, पुराचा धोका लक्षात घेता दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळमधील टाकळीवाडी येथे असून दुसरी तुकडी कोल्हापूमध्ये आहे. एनडीआरफच्या जवनांकडून पुरस्थितीची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे.
9 जुलैपर्यंत जोरदार पाऊस :भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात याच पद्धतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य:स्थितीत इशारा पातळीपर्यंत उद्या 8 जुलै पहाटेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे आज आणि उद्या होणाऱ्या पावसावरच कोल्हापुरात महापुराची परिस्थिती निर्माण होईल की नाही किंवा पंचगंगा धोका पातळीपर्यंत पोहोचेल का हे समजू शकणार आहे.
वेसरफ, कोदे ल.पा. तलाव भरले पूर्ण क्षमतेने :तीन दिवसांच्या पावसातच कोल्हापूरातील वेसरफ लघु पाटबंधारे तलाव तसेच कोदे लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. वेसरफ तलावातून सध्या पन्नास क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू आहे तर कोदे तलावातून 170 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 26 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी 9 जुलै पर्यंत देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भू:स्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
पूरग्रस्तांच्या तात्पुरती निवारा सोय करण्यासाठी प्रशासन सज्ज :दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत पूरग्रस्त नागरिकांना तात्पुरती निवारा सोय करणेबाबत प्रशासनाने काळजी घेतली आहे. त्यांच्यासाठी पाणी, लाईट व इतर व्यवस्था करण्यासाठी प्रशासन सकाळपासून धावपळ करत आहे. कोल्हापूर शहरात श्रमिक कामगार हॉल लक्ष्मीपुरी, शाहू विद्यालय, शाहू समाजमंदिर, महाराष्ट्र विद्यालय, छ. शाहू, विद्यालय बावडा, उलपे हॉल, महागावकर शाळा या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.