कोल्हापूर - जिल्ह्यात सध्या पावसाचा हाहाकार सुरू आहे. (सन 2019)साली आलेल्या महापुरापेक्षाही यंदा भीषण परिस्थिती निर्माण होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहावे. पावसाचा वाढता जोर पाहता आणि पाण्याचा वाढता प्रवाह पाहता कोणत्याही क्षणी कोल्हापूरला पाण्याचा वेढा पडू शकतो. त्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इंधन, गॅस याचा मोठ्या प्रमाणात साठा कोल्हापुरमध्ये उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडे यांनी केले आहे. ते ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी संवाद साधला आहे. 'कोल्हापूरचा इतर जिल्ह्यांची संपर्क तुटू शकतो'
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. अनेक जिल्हा, राष्ट्रीय मार्गावर पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे-बंगलोर महामार्गावरील कर्नाटककडून येणाऱ्या मांगुरजवळ दूधगंगा नदीचे पाणी आल्याने, सध्या हा रस्ता बंद करण्यात आला आहे. तर, कोणत्याही क्षणी शिरोली टोल नाका येथे पुराचे पाणी येऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय पुणे बेंगलोर मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. पुराचे पाणी या ठिकाणी आल्यास, कोल्हापूरचा इतर जिल्ह्यांची संपर्क तुटू शकतो. असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बलकवडे यांनी सांगितले आहे.
'नागरिकांनी घाबरु नये'
पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्न-धान्याचा साठा मुबलक प्रमाणात करण्याचे नियोजन सुरू आहे. अशी, माहितीही यावेळी देण्यात आली. अद्याप कोणत्याही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नसला, तर पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग झाल्यास नद्यांची पाणीपातळी पुन्हा वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे. दरम्यान, कोणत्याही अफवेला बळी पडू नये. घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही बलकवडे यांनी केले आहे.