कोल्हापूर - २०१९ साली आलेल्या महापुरातील नुकसानभरपाई चिखलीतील अनेक कुटुंबीयांना मिळालेली नाही. त्या विरोधात चिखलीतील ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठाण मांडले आहे. शासनाने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अन्यथा कुटुंबासमवेत आंदोलन करू असा इशारा चिखली ग्रामस्थांनी दिला आहे.
2019 साली आलेल्या महापुरामुळे कोल्हापुरातील प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावात मोठे नुकसान झाले होते. याचा पंचनामा करून शासनाने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली होती. महापुरात ज्यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. अशा कुटुंबीयांना राज्य शासनाकडून 95 हजारांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करून अनेक कुटुंबांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. मात्र, गावातील एकशे आठ कुटुंबियांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. महापुरातील झालेली नुकसान भरपाई आम्हाला तात्काळ द्यावी, अन्यथा कुटुंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. ज्या कुटुंबीयांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा कुटुंबीयांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.