कोल्हापूर - यंदाच्या महापुराचा सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला बसला आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप कोणतीच मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त आक्रमक झाले आहेत. तब्बल ५३ ग्रामपंचायतींना पूरग्रस्तांनी टाळे ठोकले आहे. सर्वपक्षीय पूरग्रस्त समितीने हे आंदोलन केले आहे. तालुक्यातील ५३ पूरग्रस्त गावात हे आंदोलन झाले. राज्य सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आम्ही झटका देऊ, असा इशारा पूरग्रस्तांनी दिला आहे.
शिरोळमधील पूरग्रस्त आक्रमक हेही वाचा -सीमा भागावर होणारा अन्याय तत्काळ थांबवावा, अजित पवारांचे मोदींना पत्र
- शिरोळ सर्वपक्षीय पूरग्रस्त संघटनेने आंदोलन पुकारले -
कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या महापुराचा फटका शिरोळ तालुक्याला बसतो. शिरोळ तालुक्यातील 53 गावे ही शंभर टक्के पुराच्या पाण्याखाली जातात. यंदाही 42 गावांना याचा फटका बसला. मात्र राज्य सरकारने अद्याप कोणतीच मदत जाहीर केलेली नाही. पूर ओसरून दहा दिवस उलटले तरी देखील सानुग्रह अनुदान अद्याप मिळालेले नाही. याच्या निषेधार्त आज शिरोळ सर्वपक्षीय पूरग्रस्त संघटनेने आंदोलन पुकारले होते. दोन दिवसापूर्वी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान पूरग्रस्तांची पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा प्रशासनाने सोबत बैठक लावून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्याने शिरोळ तालुक्यातील आक्रमक झालेल्या पुरग्रस्तानी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींना टाळे ठोकले आहे.
- 15 ऑगस्ट रोजी राज्य सरकारला झटका देऊ -
ज्यादा आणि सरसकट नुकसान भरपाईच्या मागणीसाठी हे आंदोलन आज करण्यात आले. या आंदोलनात महिला तरुणी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी. तसेच जिल्हा प्रशासन अजूनही पूरग्रस्तांना गांभीर्याने पाहत नसल्याने सर्वपक्षीय संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. 15 ऑगस्ट रोजी राज्य सरकारला झटका देऊ, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
हेही वाचा -हिमाचलमध्ये दुर्घटना ; 40 जणांना घेऊन जाणाऱ्या बसवर कोसळली दरड!