कोल्हापूर - मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत परीक्षा होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजातील तरुणांनी घेतली आहे. या संदर्भात दोन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्र्यांना या निर्णयाविरोधात पत्र पाठवणार असून, त्यापुढे आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोमवारी राज्य सेवेसह इतर परीक्षांच्या तारखा घोषित केल्या. त्याचा मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीकडून निषेध करण्यात आला.
तोपर्यंत राज्य शासनाने कोणत्या परीक्षा घेऊ नये -
राज्य सरकार व लोकसेवा आयोग यांनी परीक्षेच्या तारखा जाहीर करून मराठा समाजातील तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ज्यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दीड वर्षापूर्वी परीक्षेची जाहिरात काढली होती. त्यावेळी मराठा समाजासाठी (एस.ई.बी.सी.) प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. मात्र, त्यावर अंतिम सुनावणी झाली नसून पुढील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. जोपर्यंत याचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्य शासनाने कोणत्या परीक्षा घेऊ नये, अशी भूमिका मराठा समाजातील तरुणांनी घेतली आहे. सरकारी नोकरी पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दूर करण्याचा डाव राज्य सरकारने हाती घेतला आहे का, असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.