कोल्हापूरFIR Against Raju Shetty :मागील हंगामातील ऊसाला १०० रुपये तसंच चालू हंगामातील तुटणाऱ्या ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काल (गुरुवारी) तब्बल नऊ तास पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. यामुळे आता संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आणि तब्बल अडीच हजार अज्ञातांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Sugarcane Price Hike Agitation)
प्रवाशांना झाला आंदोलनाचा त्रास :कोल्हापूरजिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस आंदोलन सुरू होतं. काल राजू शेट्टी यांनी पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखत आंदोलनाची तीव्रता वाढवली. चार बैठका निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यानुसार काल राजू शेट्टी यांनी हा महामार्ग सकाळी ११च्या सुमारास अडवला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर शहरातील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेलं हे आंदोलन रात्री ८च्या सुमारास निर्णय आल्यानंतर तब्बल ९ तासांनी संपलं. दरम्यान या नऊ तासात प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.