कोल्हापूर - शिक्षकाला दमदाटी केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी कृष्णा चौगले (रा. माळवाडी, ता. पन्हाळा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. चौगले शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना तानाजी हा शासकीय कामात अडथळा आणायचा आणि शिक्षकाला दमदाटी करायचा. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी सागावकर यांनी तक्रार दिली आहे.
पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावामधील प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर येथून निर्लेखन करून मंजुरी घेण्यात आली. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून बांधकाम सुरू आहे. सध्या शाळेच्या इमारतीचे 2 स्लॅब पूर्ण झाले आहेत. हे काम सुरू असताना तानाजी कृष्णा चौगले त्या ठिकाणी कामात व्यत्यय आणायचा, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी सागावकर यांनी तक्रारीत दिली आहे.