कोल्हापूर- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी बेजबाबदार नागरिक, छोटे-मोठे व्यावसायिक बेजबाबदारीने वागत आहेत. प्रशासनाच्या कारवाईचा फास सैल पडल्याने फेरीवाले, व्यावसायिक हे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमाला हरताळ फासत आहेत. मास्क अयोग्य पद्धतीने वापर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली जात आहे. या परिस्थितीमुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
फेरीवाल्यांची कारवाईला दाद का नाही?
परिस्थितीचे गांभीर्य विसरून अनेक फेरीवाले, व्यापारी मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी विक्री करत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, रंकाळा स्टँड या परिसरात अनेक विक्रेते विनामास्क आणि ग्लोजचा वापर न करता वावरताना दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाईही केली जात आहे. मात्र, त्या कारवाईचा धसका घेतला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे? मग ही हिंमत कशामुळे असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
कारवाई होते मग भीती का नाही? सध्या दिवाळीच्या खरेदीची लगबग वाढली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या महाद्वार, राजारामपुरी आदी परिसरात मोठी गर्दी होते. मात्र कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदींच्या वापर व्यापारी करणार का? याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर जात असताना जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून सध्या कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराच्या आत आली आहे. मात्र बेजबाबदार नागरिक व छोटे मोठे व्यावसायिक पुन्हा एकदा हा धोका पत्करण्याच्या मानसिकतेत आहेत का काय? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
कारवाई होते मग भीती का नाही? महापालिका कर्मचाऱ्यांची गाडीत बसूनच कारवाई- दररोज महापालिकेचे कर्मचारी कारवाई करत असतात. रोज इतक्या रकमेची कारवाई केली जात असल्याचा आकडा प्रसिद्धी माध्यमांना दिला जातो. मात्र कारवाईचा धाक किती व्यावसायिक फेरीवाल्यांना आहे? हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तवणूकीवरून दिसते. अनेक कर्मचारी रस्त्यावर उन्हा-तान्हात उभे राहून कारवाई करत आहेत. मात्र काही अधिकारी व कर्मचारी गाडीत बसूनच पावती फाडतात. ज्यावेळी अधिकारी रस्त्यावर उतरून कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारतील. त्याचवेळी त्यांच्या कारवाईची धडकी या कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उयायोजनांच्यान नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना बसणार आहे.
तत्कालीन आयुक्तांनी सायकलवरनी केली होती कारवाई-
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील प्रमुख रस्त्यावर सायकवल फिरून आढावा घेत कारवाईचा धडका लावला होता. त्यामुळे कारवाईचा धसका छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी घेतला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता कारवाईची फास सैल पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे कडक कारवाईचे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारणे गरजेचे आहे.
व्यापाऱ्यांना सूचना देऊच, ग्राहकांनीही काळजी घ्यावी-
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. ही आनंदाची बाब असली तरी धोका कायम आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीला जात असताना सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करा, तसेच स्वच्छतेला महत्व द्या, असे आवाहन छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ.बी. वाय माळी यांनी केले.
सार्वजनिक ठिकाणी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मी स्वतःहून सर्व फेरीवाल्यांना मास्क, सॅनिटायर व ग्लोज वापरण्याच्या सूचना देतो. मात्र काही व्यापारी नजर चुकवून हे नियम पाळत नाहीत. तर ग्राहकांनी देखील नियमांचे पालन करावे, असे फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष किरण गवळी यांनी सांगितले.
हेही वाचा - मास्क नाही तर प्रवेश नाही : कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची मोहीम आता राज्यभरात