कोल्हापूर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व शेतीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे जानेवारी महिन्यापासून बंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास तीन कोटी रुपयांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तर, राज्यात ही आकडेवारी 70 कोटींच्या घरात आहे. शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे.
याबाबत वनविभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याला कोणताच प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कोरोना संकट येण्याच्या आधीपासून हा निधी देणे बंद झाले आहे. वन्य प्राण्यांनी शेतीचे केलेले नुकसान, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना मिळणारे नुकसान आणि प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबाबत नाराजीचा सूर आहे. सरकारने ही रक्कम लवकरात लवकर द्यावी अशी विनंती खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे.
नुकसान भरपाईच्या रकमेत झाली होती वाढ -
वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसान आणि हल्ल्याच्या भरपाईबाबत ऑगस्ट २००४ मध्ये सरकारी निर्णय घेण्यात आला. पुढे राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने वेळोवेळी केलेल्या शिफारशी तसेच वन्यजीव संरक्षण व व्यापक जनहित आदी अनुषंगिक बाबींचा विचार करून परिस्थितीनुसार संबंधितांना नुकसान भरपाई व अर्थसहाय्य देण्यासंबंधी राज्य सरकारने वेळोवेळी बदल केले. याचप्रमाणे संबंधित नुकसान भरपाईपोटी सध्या संबंधितांना देण्यात येणारी अर्थसहाय्य रक्कम वाढत्या महागाईदराच्या तुलनेत कमी असल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे त्यामध्ये भरीव वाढ करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन होते. यासाठी पावसाळी अधिवेशनात ९ जुलै २०१८ रोजी विधानसभेतील पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांकडून मनुष्यहानी व पशुधनहानी प्रसंगी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य रक्कमेत वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर परिपत्रक जाहीर काढले होते.
कोल्हापूर विभाग एकूण प्रलंबित प्रकरणे आणि नुकसान भरपाईची रक्कम (५ मे 2020 पर्यंत)
कोल्हापूर, उपवनसंरक्षक विभाग
- पीक नुकसान प्रकरणे - २,६६७
नुकसान रक्कम - १,९१,८२,७२५ रुपये
- पशुहानी प्रकरणे - १४
नुकसान रक्कम - १,५२,२७५ रुपये
- मनुष्यहानी प्रकरणे - ५
नुकसान रक्कम - ६,००,००० रुपये
एकूण - १,९९,३५,००० रुपये.
सातारा, उपवनसंरक्षक विभाग
- पीक नुकसान प्रकरणे-१२७१
नुकसान रक्कम- ३६,९२,२९६ रुपये
- पशुहानी प्रकरणे-९०
नुकसान रक्कम-७,६०,५५० रुपये
एकूण - ४४,५२,८४६ रुपये.