कोल्हापूर - जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यात टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. मात्र, कोणत्याच लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे जनतेकडे मताचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी हत्ती प्रश्नावर गप्प का? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
आजरा तालुक्याचा पश्चिम भाग वन्यप्राण्यांचे निवासस्थान बनत चालला आहे. हत्ती आणि गवे जणू शेतातील रहिवासीच झाले आहेत. त्यांच्याकडून शेती व शेतीच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेती उत्पादन खर्च जास्त व नुकसान भरपाई कमी, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा पाच महिन्यात बंदोबस्त करण्यात आला. आजरा तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून हत्ती तळ ठोकून आहेत. तरी देखील प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. गव्यांकडून पेरणोली, देवकांडगाव, मडिलगे, सोहाळे चांदेवाडी या गावातील शेतकऱयांना आजपर्यंत नुकसान भरपाईदेखील मिळालेली नाही. त्यामुळे मताचा जोगवा मागणारे हत्ती प्रश्नाबद्दल मूग गिळून गप्प का आहेत? असा प्रश्न शेतकरी व रहिवासी विचारत आहेत.