कोल्हापूर : गेल्या काही दिवसात कांद्याला दर नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हातात तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त केले. तर भाव मिळत नसल्याने शेतकरी फुकट भाजी वाटल्याची घटना ताजी असताना आता कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातून देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. कांद्यापाठोपाठ वांग्याचे दर देखील घसरले आहे. येथील शेतकऱ्याला प्रति किलो 27 पैसे इतका नीचांकी दर देण्यात आला आहे.
घोर निराशा :कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर देण्यात आला आहे. शेतकऱ्याचा पिकातून वाहतुकीचा खर्च देखील निघालेला नाही. हा आजपर्यंतचा सर्वात निश्चित दर आहे. जगदाळे कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात, मात्र आज इतक नीचांकी दर त्यांच्या वांगी पिकाला मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या पदरी घोर निराशा पडली आहे. जगदाळे यांनी दिनांक 1 मार्च रोजी 237 किलो वांगी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवली होती. तर याची एकूण किंमत ही 592 रुपये देण्यात आली. यातून भाडे आणि हमाली भत्ता वगळून केवळ एकूण 66 रुपये या शेतकऱ्याला मिळाले आहेत. एका बाजूला 27 पैसे इतक्या निश्चांकी दराने शेतकऱ्याकडून वांगी खरेदी केली जात आहे. बाजारात मात्र हीच वांगी 30 ते 40 रुपये किलो विकली जात आहे.