कोल्हापूर- महावितरण कंपनीने कृषी-औद्योगिक, घरगुती, वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्याविरोधात ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. तसेच फसवणूक करणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्या अडवून जाब विचारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी वीज दरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यापासून राज्यातील कृषीपंपधारक, घरगुती, औद्योगिक ग्राहकांची बेसुमारपणे आर्थिक लूट या सरकारच्या काळात सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच वीजनिर्मिती खर्च, प्रशासकीय खर्च आणि वीज गळती यावर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे एका युनिटमागे १ रुपये ९० पैसे खर्च वाढत आहे. देशात सर्वात जास्त महाग वीजपुरवठा करणाऱ्या राज्यात महाराष्ट्र पहिल्या तीन राज्यामध्ये आहे. यापूर्वी मोर्चा काढून यासंदर्भात सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यांनी हे आश्वासन पाळले नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढला. कोल्हापूरच्या दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकऱयांनी वीज दरवाढ विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या मोर्चादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.