कोल्हापूर - भावकीतल्या भांडणाला वेगळाच रंग दिल्याचा प्रकार कोल्हापूरातल्या हुपरी गावात ( Families outcast Issue in rukdi village in kolhapur ) घडला आहे. जवळपास 7 ते 8 कुटुंबांना वाळीत टाकण्यातआल्याची माहिती स्वतः गावकऱ्यांनी दिली होती. मात्र त्यामधून वेगळेच सत्य बाहेर आले आहे. गेल्या 20 वर्षांपासून गावातल्या धनगर समाजातील लोकांचे आपापल्या भावकीत वाद होता. त्या वादामुळेच सर्वजण अबोला धरून होते. मात्र याला वाळीत टाकल्याचा रंग देण्यात आला. काल या मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने ( MP Dhairyasheel Sambhajirao Mane ) यांनी स्वतः यामध्ये हस्तक्षेप करून त्यांच्यातील भांडण मिटवले. सोबत पोलीस अधिकारी, सरपंच आणि इतर गावकऱ्यांनी मिळून या प्रकरणावर पडदा टाकला.
काय आहे प्रकरण? : कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावाकडे एक सदन गाव म्हणून ओळखले जाते. खासदार धैर्यशील माने यांचे हे मूळ गाव. त्यांच्याच गावामध्ये दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली. आजपर्यंत गावात सर्वच समाजाचे लोक गुण्या गोविंदाने राहत आले आहेत. मात्र रुकडी गावातील माळावर असणाऱ्या धनगर मळ्यातील गणेश गल्लीमधील आठ कुटुंबांना त्यांच्यात भावकीतील काहींनी वाळीत टाकले असल्याची तक्रार काहीजणांनी केली. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या कुटुंबाबरोबर कोणी बोलायचे नाही, देवळात यायचे नाही, शाळेमध्ये त्यांच्या मुला मुलींबरोबर बोलायचे नाही. जर कोणी बोलले तर त्यांना तीन ते पाच हजार रुपये दंडही केला जातो, अशी इथल्या नागरिकांनी तक्रार केली होती. याबाबत पोलिसांकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली होती. मात्र जेंव्हा हा प्रकार माध्यमांमधून बातम्यांद्वारे समोर आला. तेंव्हा मात्र तत्काळ या मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः लक्ष घालत एक बैठक लावली. यामध्ये या परिसरातील पोलीस निरीक्षक, गावचे सरपंच, तंटामुक्त समिती तसेच इतर गावकरी यांना देखील सामील करून घेतले. बैठकीत सुरुवातीला वाळीत टाकले आदी गोष्टींवर चर्चा झाली. मात्र हा विषय पुढे भावकीतला वाद असल्याचे समोर आले. जस जशी चर्चा पुढे गेली तसा मुख्य वाद हा भावकितला असल्याचे समोर आले. एक दोन नाही तर तब्बल चार तास हा वाद मिटविण्यात गेल्याचे स्वतः खासदार धैर्यशील माने यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे या चार तासांच्या चर्चेत 15 मिनिटे जो अबोला आहे, त्यावर चर्चा झाली. मात्र पुढे त्याच भावकीतला आणि समाजातील समाजमंदिर आदी ठिकाणांवरून चर्चा झाली. मात्र ज्या पद्धतीने वाळीत टाकण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे खासदार माने यांनी स्पष्ट केले आणि 25 वर्षांचा भावकीतला वाद मिटविल्याचे सांगितले.