कोल्हापूर- तुमची सेवाच बंद करा संपूर्ण जग पुन्हा नॉर्मल होईल, अशा अनेक प्रतिक्रिया आज ट्विटरच्या माध्यमातून अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांपासून फेसबुक, व्हाॅट्सअप आणि इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. याबाबत स्वतः फेसबुकने ट्विटरवर माहिती दिली असून लवकरच या सेवा पूर्ववत होतील अशी माहिती दिली आहे.
अनेकांनी फेसबुक, व्हाॅट्सअप आणि इन्स्टाग्राम वापरण्यात अडचणी येत, असल्याचा तक्रारी ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत. यावेळी भारतातले युजर्सही प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
फेसबुक, व्हाॅट्सअप आणि इन्स्टाग्राम या तीनही प्लॅटफॉर्मवर इमेज अपलोड होत आहेत, पण डाऊनलोड होत नाहीत. भारतात सर्वत्र ही समस्या असल्याचे अनेकांनी ट्विटरवरून सांगितले आहे. अनेकांनी ट्विटर चालू असल्याने आपला राग व समस्या ट्विटरवरून मांडल्या आहेत. मात्र, कंपनीने हा सर्व प्रकार कशामुळे झाला आहे, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
फेसबुक, व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम थंडावले !
दरम्यान, जगभरातून या तीनही अॅप्लिकेशनना ट्विटरच्या माध्यमातून ट्रोल करण्यात आले आहे. तुमच्या सर्वच सेवा बंद करा, म्हणजे जग नॉर्मल होईल अशा काही भन्नाट कमेंटनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातल्या कोट्यवधी लोकांना सध्या याचा अनुभव येत असून, फोटो पाठवण्यासह डाऊनलोडसुद्धा करता येत नाहीत. त्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.